शिरुर दिनांक ( वार्ताहर ) करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गावर बाभुळसर खुर्द गावात असणाऱ्या पिरसाहेब मंदीराच्या समोर सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकडावर बसुन गप्पा मारणाऱ्या चार व्यक्तींना करडे येथुन रांजणगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने रामदास किसन शिंदे (वय 55) हे मरण पावले तर तीन जण जखमी झाले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महादु विठठल वांझुळ, (वय 48) रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे यांनी फिर्याद दाखल केली असुन आशिष योगेंद्र बांदल (रा.करडे ता. शिरूर जि. पुणे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि 29) रोजी सकाळी 8 च्या सुमारास 1) रामदास किसन शिंदे, 2) संतोष नंदु वाळके, 3) अकबर अलीभाई शेख, महादु विठठल वांझुळ हे सर्व (रा. बाभुळसर खुर्द ता. शिरुर, जि. पुणे) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकडा वर बसुन बोलत असताना आरोपी आशिष योगेंद्र बांदल (रा.करडे ता. शिरूर जि. पुणे) हा करडे येथुन रांजणगावच्या दिशेने त्याच्या कार क्रं .एम .एच .12 पी. सी. 5333 ने भरधाव वेगाने चाललेला असताना बाभुळसर खुर्द येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकडाला त्याच्या कारची जोरदार धडक बसल्याने वरील चार जण जखमी झाले. या अपघातात फिर्यादी महादु वांझुळ यांचा पाय फॅक्चर झाला असुन त्यांच्या डोक्यास व कमरेस मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच संतोष वाळके आणि अकबर शेख यांना किरकोळ दुखापत झाली असुन रामदास शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.