पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल,
" पिकं भुईसपाट, हातातोंडाशी आलेला घास गेला"
"आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं"
पाचोड (विजय चिडे) पैठण शहरांसह ग्रामीण भागात मंगळवारी गारांच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सायंकाळी अचानक वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने पैठण तालुक्यातील शेतकरी आणि वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली. तसेच अचानक पडलेल्या लिंबूच्या आकारएवढ्या गारांनी शेतकऱ्यांचे शेतीचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर"आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं"असे म्हणण्याची वेळ आली असून आज शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.मंगळवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक ६ वाजेच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्यांसह गारांचा पाऊस सुरु झाला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील शेतकरी आणि वाहन चालकांची चांगलीच धांदल उडाली. कसेतरी करून आपले घर किंवा सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी गडबड सुरू झाली. शेतकऱ्यांच्या घराबाहेर उभे असलेल्या जनावरांना या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये भागात जोरदार गारपिट झाली आहे.
तालुक्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यंदा निम्म्याहून जास्त शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली होती. या पावसामुळे आंब्याच्या कैरीही गळून पडल्या. तसेच जनावरांसाठी गोळा केलेला चारा तसेच शेतातच काढून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. परिणामी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे बळीराजा पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे.तरी शासनाने या गारपीट मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे.