*सचिन बेंडभर यांचा संस्कारशील काव्यसंग्रह - मामाच्या मळ्यात*

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

         बालमित्रांनो, तुम्हाला मामाचं गाव म्हटलं की, नक्कीच 'मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया' हे गदिमा यांचं गाणं आठवत असणार. आज मी तुम्हाला एका 'मामाच्या मळ्यात' नेणार आहे. त्या मामाचं नाव आहे, सचिनमामा! सचिनमामा शिक्षक आहेत. अहं! घाबरायचं नाही. सचिनमामा शिक्षक असले तरीही रागावणार नाहीत, मारणार नाहीत तर उलट तुम्हाला छान छान गोष्टी सांगतील, गाणी ऐकवतील. गाणी ऐकवताना तुमच्यासह नाचतीलही! आणि हो त्यांच्या मळ्यातील खूप काही खायलाही देतील. आली ना तुम्हाला तुमच्या मामाची आठवण! अगदी तुमच्या मामासारखाच आहे हा सचिनमामा! चला तर मग जाऊ या मामाच्या मळ्यात!

     सचिन बेंडभर हे नाव मराठी साहित्य क्षेत्रातील एक ठळक नाव! बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, अनुवाद, संयुक्त इत्यादी विभागात त्यांची चाळीस पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. दरवर्षी पन्नास पेक्षा जास्त दिवाळी अंकांमधून त्यांचे विविध प्रकारचे साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरते. बेंडभर यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'कळो निसर्ग मानवा' या कवितेचा इयत्ता सहावीच्या पुस्तकात समावेश आहे हा फार मोठा गौरव आहे.

        मळा म्हटलं की, साहजिकच हिरवगार रान, फळा-फुलांनी बहरलेली झाडं. झाडांवर बसलेल्या पक्षांचा किलबिलाट, पाण्यानं भिजलेली जमीन, गाई-वासरं, म्हशी असं सारं काही नजरेसमोर येते. त्यातच मामाचा मळा असला की मग मळ्यात नि बागेत असलेलं सारं काही आपलच! कारण तिथे कुणी रागावणारं नसतं, ओरडणारे नि मारणारे नसतात. 

      बेंडभर यांचा नुकताच प्रकाशित झालेला 'मामाच्या मळ्यात' हा मनमोहक, आकर्षक, देखणा असा बालकाव्य संग्रह वाचण्यात आला आणि मन हरखून गेलं. दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी अत्यंत सुरेख, सुबक असा हा संग्रह प्रकाशित केला आहे. सागर नेने यांनी अत्यंत सुंदर असे मुखपृष्ठ चितारले आहे. हे मुखपृष्ठ पाहताक्षणीच बालक पुस्तकाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. रानात झाडाला बांधलेला झोका घेणारी बालिका हा या मुखपृष्ठाचा आत्मा ठरावा. आतील रंगीत छायाचित्रे ही कवितेचा आशय स्पष्ट करणारी आहेत. शिवाय गुळगुळीत कागद, बालकांना आवडेल असा अक्षरांचा आकार आणि सचिनमामांनी चढवलेला शब्दांचा साज यामुळे हे पुस्तक वाचण्यासाठी घराघरांतून बालकांमध्ये लुटूपुटूच्या लढाया होतील आणि ह्या लढाया थांबविण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागेल हे निश्चित!

       पुस्तकाच्या शीर्षक स्थानी असलेली पहिलीच कविता म्हणजे 'मामाच्या मळ्यात!' मामाच्या मळ्यात काय काय आहे याचं वर्णन बेंडभर यांनी खूप छान केले आहे. आज शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शहरी भागातील मुलांना शेत, बागा, मळे यांची माहिती फार कमी असणार आहे. कविच्या मळ्यात भरपूर रानमेवा आहे. सावलीला बसायला वडाचं झाड आहे, पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आंब्याच्या झाडाला लागलेले पाड आहेत. पिकलेल्या चिंचा, पेरू, करवंद, जांभळं,चिकू, पिकलेली बोरं हे सारं पाहता पाहता, खाता- खाता ऊन झाले म्हणून सावलीला बसायचा विचार येईल पण मामा सावध करतो की, एखादं भलमोठं नारळ धपकन पडेल. मळ्यात फिरून फिरून थकलेलं पाहून मामा म्हणतो,

मामा म्हणतील बसा बरं!

शहाळी पिऊन खा खोबरं

        बालमित्रांनो, ससा-कासव यांची कथा ऐकली नसेल असा बालक सापडणे शक्यच नाही. जेव्हा तो हरलेला ससा हिरमुसला होऊन इतर सशांजवळ जातो आणि का हरलो हे सांगतो तेव्हा एक म्हातारा ससा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो,

प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता

दक्ष असे जो कामी

जिद्द चिकाटी अंगी बाणतो

तो विजयाचा स्वामी।।

     या ओळीतून सचिनमामा फार मोठा संदेश तुम्हा बालकांना देतात. स्पर्धा ही स्पर्धा असते. प्रत्येक जण ती जिंकण्यासाठीच उतरतो. त्यामुळे कुणालाही कमी न मानता स्वतः दक्ष राहून जिद्द, चिकाटीने जो आव्हानांना सामोरे जातो त्याच्या गळ्यात विजयश्री माळ घालते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. ठिकठिकाणी स्पर्धा असतात त्यामुळे 'यशाने हुरळून जायचे नाही आणि अपयशाने खचून जायचे नाही.' असा मोलाचा संदेश आपल्याला मिळतो जो जीवनात अत्यंत आवश्यक असा आहे.

     आज सर्वत्र असमानता मोठ्या प्रमाणात दिसते आहे. 'दुनिया करा रे एक सारी!' या कवितेत पक्षांचे उदाहरण देऊन कवी कळकळीने सांगतात,

जन्मदात्री मी, सांगते आई

जात गाडून, घ्या भरारी

गोड गळ्याने साद घालून

दुनिया करा रे एक सारी।

    आज अनेक कुटुंबात विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळते. परंतु कवी एकत्र कुटुंबाचे महत्त्व जाणून आहेत म्हणून ते 'चिंटू' या कवितेत आजीचे महती सांगतात-

आजारपणात औषधपाणी

आजीच जागते रात रात

जडीबुटी काढा द्यायला,

डॉक्टर होते तीच घरात

      त्याच बरोबरीने 'माझेआजोबा' या कवितेत टीव्ही, मोबाईल, हेडफोन यात घरातील सारे हरवलेले असताना नेहमीच उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणजे आजोबा! कवी म्हणतो...

आजोबांना कौतुक भारी,

कधीच नसतात ते घाईत,

नंतर सांगेन चूप बस

असं कधीच म्हणत नाहीत।  

      पूर्वी अनेक मैदानी खेळ खेळले जायचे त्यामुळे व्यायाम होऊन बालकांचं आयुष्य निरोगी, बळकट असायचे. कबड्डी, तळ्यात मळ्यात, मामाचे पत्रं हरवले आणि इतर खेळ खेळताना होणाऱ्या गमतीजमती खूप छान असायच्या. तळ्यात मळ्यात या कवितेत याच खेळाचे वर्णन सचिनमामाने मजेशीर केले आहे... मामाने रंगविलेला हा खेळ कोण खेळत आहे तर आजोबा नि आजी! वाचल्याबरोबर चेहऱ्यावर हसू फुलले ना. या खेळातील एक गमतीचा क्षण तुम्हाला कवी सांगतात-

तळ्यात म्हणता आले बाहेर

आजी बोले झाले बाद

खेळ संपला सुरू जाहला,

दोघांमध्ये लगेच वाद।।

     बिनडोक कोण, जावईबापू, काकडीला राजी अशा अनेक कविता मजेदार तर आहेतच पण बालकांना नकळत संदेश देणाऱ्या आहेत. 'सकाळ झाली' ही कविता एक मस्त आरोग्यदायी संदेश देते...

सकाळ झाली उठा बुवा

ब्रश करुन तोंड धुवा.. 

आनंदी राहावे या कवितेतही अत्यंत आवश्यक आणि बालकासाठी महत्त्वाचा संदेश कवी देतात...

लवकर झोपावे

लवकर उठावे

आनंदी राहावे

सर्वकाळ।।

        'आपला हात' ह्या कवितेत हाताचे गुणविशेष आणि कार्य ह्याचे सुरेख वर्णन वाचायला मिळते.

'गोरी गोरीपान, फुलासारखी छान

दादा मला एक वहिनी आण...' ह्या कवितेची आठवण करून देणारी सचिनमामाची कविता म्हणजे 'मला वहिनी हवी अशी' होय. वहिनीकडून भरपूर अपेक्षा असलेली ही कविता बालकांनो तुम्हाला नक्कीच आवडेल. अर्थात ही एकच कविता नाही तर इतरही कविता तुम्हाला आवडतील आणि तुम्ही गुणगुणायला लागाल इतक्या छान आहेत, महत्त्वाचे म्हणजे समजायला मुळीच अवघड नाहीत. कवी सचिन बेंडभर स्वतः शिक्षक आहेत. बालविश्वात रमणारे आहेत. बालकांचे मानसशास्त्र आणि त्यांचा आवाका लक्षात घेऊन साध्या- सोप्या भाषेत गमतीदार, उपदेशांचे अवास्तव डोस न देता बालकांना आवडतील, भावतील अशा विचारातून त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत.

       आपण सारेच नेहमीच विशेषतः नववर्षाच्या सुरुवातीला अनेक संकल्प करतो परंतु ते पूर्ण करण्यासाठी मात्र नानाविध कारणं देऊन पळ काढतो. कवी सचिन बालकांकडून एक साधी अपेक्षा करतात ती म्हणजे 'झाडे लावूया, झाडे जगवूया !' ही अपेक्षा फार मोठी आणि कठीण नाही तेव्हा बालकांनो आपल्या लाडक्या मामांच्या अपेक्षेला भरभरून साथ द्या म्हणजे ते एकापेक्षा एक सरस पुस्तके तुमच्यासाठी नक्कीच लिहितील. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला वाचायला द्यावे असा हा कवितासंग्रह आहे.

                    ००००

मामाच्या मळ्यात: कविता संग्रह

कवी : सचिन बेंडभर 

प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन,

               पुणे

पृष्ठसंख्या: ४८

किंमत: ₹१३०/-