जिंतूर -औंढा महामार्ग रस्त्यावरील भोगाव जवळ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने दोन वर्षाच्या चिमुरडीला कसलाही मार लागला नाही. ही घटना आज शनिवारी (दि.6) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून जिंतूर-औंढा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. नेहमीच अपघात होत असतात. रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच भोगावजवळ दुचाकीस्वार मनोज मोरे शहरातील रुग्णालयात उपचार करून भोगाव गावाकडे निघाले. सोबत महिला व लहान मूल घेऊन दुचाकीवरून जात असताना औढ्याकडून भरधाव येणाऱ्या कार क्रमांक एम एच 17 ए .जी 5524 या वाहनाने जोरदार दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील मनोज मधुकर मोरे (वय 30 वर्ष),भाग्यश्री मोरे (वय 25 वर्षे) हे दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना ग्रामस्थ शेख मुनाफ व इतर नागरिकांनी जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. फराज खान, परिचारिका वर्षा हरकळ, मनीषा देशमाने आदींनी प्राथमिक उपचार केले. मनोज मोरे यांच्या पायाला, हाताला व भाग्यश्री मोरे यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन वर्षाची चिमुरडी हवेत उडून बोनेटवर जाऊन आदळली तरी देखील तिला सुदैवाने काही मार लागलेला नाही. ही घटना घडताच चार चाकीचा चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस निरीक्षक केंद्र, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुरसुडकर, होमगार्ड मधुकर राठोड आदींनी घटनास्थळी येऊन भेट देत प्राथमिक पंचनामा केला.