पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक इसम दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या इसमा बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.
विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक इसम मासेमारी करत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सांगवी सांडस बाजूने दुचाकीहून आलेला एक इसम दुचाकीसह पाण्यामध्ये पडून वाहून गेल्याचे दिसून आले, घटनेची माहिती काही वेळात सर्वत्र पसरताच पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, पोलीस पाटील शरद लोखंडे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, मंडलाधिकारी राजेंद्र आळणे, वैभव गवारे यांसह आदींनी सदर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शोध सुरु केले, तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे सचिन गवळी, अंबादास घनवट, उमेश फाळके, अक्षय बागल, तेजस डोंगरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्यामध्ये वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेतला मात्र वाहून गेलेला इसम मिळून आला नाही तसेच सदर इसमाच्या नावाबाबत देखील काहीही माहिती मिळाली नाही, सध्या भीमा नदीतून ७०३४ क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने इसमाच्या शोध कार्यात अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. मात्र दिवसभर शोध कार्य सुरु असून देखील पाण्यात वाहून गेलेल्या इसमाबाबत काहीही शोध लागला नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर नदीच्या आजूबाजूला काम करणाऱ्या तसेच पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.