सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी अशोक नाईकवाडे
औसा/ प्रतिनिधी : - 19 फेब्रुवारी 2023 रोजी औसा तालुक्यातील सर्व शिवप्रेमी बांधवांच्या सहकार्याने होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती समितीच्या कार्यकारणी निवडीसाठी माजी अध्यक्ष बाबासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. समस्त शिवप्रेमी बांधवांच्या सहकार्याने औसा शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट सजावट आणि विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प शिवप्रेमी बांधवांनी केला असून जयंती समितीच्या अध्यक्षपदी अशोक नाईकवाडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम नलगे, आणि गोविंद जगताप, सचिव गुंडानाथ सूर्यवंशी, सहसचिव गुणाजी पवार, कोषाध्यक्ष रमेश मोरे, सहकोषाध्यक्ष अमित शेटे, स्वागताध्यक्ष अच्युत पाटील, सजावट प्रमुख बाळासाहेब सोनवळकर, प्रसिद्धी प्रमुख गोविंद खंडागळे आणि मिरवणूक प्रमुख पदी बाळासाहेब नरवडे व आदिनाथ धानूरे यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीने शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत थाटामाटा मध्ये साजरा करण्याचा संकल्प केला आहे. औसा शहरातील मराठा भवन येथे प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच छावा ग्रुपच्या वतीने ॲप्रोच रोड चौकात प्रतिवर्षाप्रमाणे शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील समता नगर, मुक्तेश्वर नगर या भागातही छत्रपती शिवरायांचा प्रतिमेचे पूजन करून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे महंत राजेंद्र गिरी महाराज व मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणीने यावर्षीचा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ठरविले आहे ,अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गोविंद खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाअन्वये दिली आहे.