मला डोळे झाकताच उन्हात राबणारी माय दिसते- कवी अनंत राऊत -

कवि दिनकर धुमाळ यांच्या 'पाचुंदा' कवितासंग्रहाचे प्रकाशन

आकाश भोरडे

 तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी-:

तळेगाव ढमढेरे (ता शिरूर) येथे 'पाचुंदा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आई-वडिलांविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करताना, 

कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, 

कुणाला मेनका, उर्वशी, रंभा दिसते, 

पण मला डोळे झाकताच

उन्हात राबणारी माय दिसते. 

असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी केले. स्व. दिनकर धुमाळ यांच्या स्वलिखित कवितांच्या 'पाचुंदा' या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वडिलांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या निखिल धुमाळ व श्रद्धा धुमाळ या भावंडांचा आदर्श समाजातील इतर मुलांनी घ्यायला हवा असेही यावेळी ते म्हणाले. 

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिक्षक भवन येथे रविवार (दि.११) रोजी श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्रीमती बबईताई टाकळकर माध्यमिक आश्रमशाळेतील मा.मुख्याध्यापक स्व.दिनकर धुमाळ सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधुन त्यांच्या स्वलिखित कवितांच्या 'पाचुंदा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांतकाका पलांडे हे होते. पाचुंदा हा कवितासंग्रह निखिल दिनकर धुमाळ व श्रद्धा दिनकर धुमाळ यांनी संपादित केला असुन सुप्रसिद्ध लेखक प्रा.कुंडलिक कदम यांनी प्रस्तावना लिहिली आहे तर परिस पब्लिकेशनने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. 

यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत पलांडे, उपाध्यक्ष रावसाहेब करपे, सुदाम चव्हाण, कांतीलाल टाकळकर, हिरामण चौधरी, तुळशीराम दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाजीराव पुंडे, नारायण भोसले, रमेश वाळके, अर्जुन चव्हाण, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे,कवी आकाश भोरडे, धुमाळ कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रपरिवार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिनकर धुमाळ सरांच्या कवितांचे अभिवाचन शोभा भोसले यांनी तर प्रास्ताविक लेखक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले व सुत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी भरत दौंडकर यांनी करून आभार निखिल धुमाळ यांनी मानले.

*खडकवाडी येथे उभारणार कवितेची गुढी*

स्व. दिनकर धुमाळ यांचे जन्मगाव असणारे खडकवाडी(ता.आंबेगाव) येथे मुख्य चौकात 'माझे गाव' या कवितेची गुढी उभारा त्यासाठी लागणारा सर्व खर्च श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ करेल असे प्रतिपादन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांतकाका पलांडे यांनी केले.