मुंबई : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून .मनोज गरबडे, विजय ओव्हाळ, धनंजय इजगज तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हॅशटॅग ‘Release Manoj Garbade’ असा ट्रेंड सोशल मीडियावर चालवण्यात येत आहे.

मनोज गरबडे यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केल्याचं या पोस्टमधून सांगण्यात येतंय. “पोलिसांच म्हणत आहेत की, पोलीसांना धक्काबुक्की केली आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणला म्हणून कलम 353 लावले. परंतु महापुरूषांचा अपमान केल्यामुळे शाई  फेकली. जे की गरजेचे होते. भाजपच्या अशिक्षित मंत्र्याने बेताल वक्तव्य करण्याआधी विचार करायला हवा होता नंतर तत्काळ पोलिसांनी मनोज गरबडेंना पकडले प्रसंगी लातांनी तुडवले मग यात पोलिसांना धक्काबुक्की कधी झाली?, मग 353 कुणासाठी?, असे सवाल या पोस्टमधून विचारले जात आहेत.

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही पोस्ट शेअर करत मनोज गरबडे यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली असल्याचा दावा केला आहे. “मनोज गरबडे यांच्या शाईफेकिचे समर्थन नाही पण त्यांनी केलेले हे कृत्य व्यक्तिगत स्वार्थासाठी केले नसून महापुरुष सन्मानासाठी केले आहे हे लक्षात घ्यावे. खोट कलम लावून त्याला आयुष्यातून उठवण्याचा कुणाचा डाव असेल तर शिवभीमसैनिक यांचा तांडव महाराष्ट्र पाहिल”, असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

खरे तर चंद्रकांत पाटील हे एका स्थानिक कार्यकर्त्याच्या घरातून बाहेर पडताना हा शाईफेक झाली. मग तिथे कुठले सरकारी काम होते?, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निव्वळ मोघम आणि बेकायदेशीर कलम लावले असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय.