समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या”, काँग्रेसची मागणी

औरंगाबाद : नागपूर ते मुंबई दरम्यान मराठवाडा आणि वदर्भातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पुन्हा नामकरण करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे प्रदेश समन्वयक सुनिल सावर्डेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यात समृद्धी महामार्गाचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्ग मंजूर झाल्यानंतर भाजप सरकारने या महामार्गाला समृद्धी महामार्ग असे नाव दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे नामकरण यापुढे ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे झाले होते. आता पुन्हा या महामार्गाचे नाव बदलून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. “समृद्धी महामार्गास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे प्रदेश समन्वयक सुनिल सावर्डेकर यांनी माझी भेट घेऊन निवेदन दिले.” असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.