लोणीकंद येथील सनी शिंदे व त्याचे वडील मारुती शिंदे यांच्या दुहेरी खून प्रकरणात व मोक्क्यातील गुन्ह्यात मागील ७ महिन्यांपासून फरार असलेल्या माऊली उर्फ केतन रामदास कोलते (रा. बकोरी) यास लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने बीड येथे सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथील सचिन शिंदे खून प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या प्रथमेश उर्फ सनी शिंदे व त्याचे वडील मारुती शिंदे यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी इतरांना अटक केली असताना माऊली कोलते हा मागील ७ महिन्यांपासून फरार होता. कोलते याच्या अटकेसाठी लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकातील उपनिरीक्षक सुरज गोरे व समीर पिलाणे यांनी खास खबऱ्यांकडून माहिती मिळविली असता तो बीड येथे असल्याचे समजले. बीड येथील सहयोग नगर भागात सापळा रचून पोलिसांनी त्यास अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी माऊली कोलते यास येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या ताब्यात देण्यात आले.