दहिवडी येथे साडेतीन एकर ऊस अज्ञाताने पेटवला

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

दहिवडी (ता शिरूर) येथे आज रविवार (दि.४) रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचे ऊस पिक पेटवल्याची घटना घडली असून यामध्ये जवळपास साडेतीन एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडला आहे.

दहिवडी (ता.शिरूर) येथील सिताराम मांजरे,माणिक चव्हाण, लक्ष्मण मुळीक, सोनबा मांजरे, रोहिदास दौंडकर व रामभाऊ दौंडकर या शेतकऱ्यांचा ऊस अज्ञात व्यक्तीने दुपारी काही वेळाच्या अंतराने पेटवून दिला. ऊस पिकाला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व तरूणांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र यामध्ये साडेतीन एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडुन जळुन खाक झाला असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सदर आग विझवण्यासाठी सचिन लवांडे, विकास गारगोटे, विशाल गारगोटे, राहुल मांजरे, अनिल मांजरे, स्वप्नील मांजरे, सचिन मांजरे, संतोष मुळीक, धनंजय गायकवाड, देविदास दौंडकर, राहुल लवांडे, अविनाश मांजरे, संतोष गायकवाड, देविदास गारगोटे या युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले.