राजापुर: मुंबई - गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाक्यावर १ डिसेंबरपासून होणारी टोलवसुली आता ५ डिसेंबरपर्यंत पुढे गेली आहे. मात्र वाटूळ ते टाकेवाडी तळगावपर्यंत रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असतानाही टोलवसुली कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याचे काम पूर्ण करा, ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करा मगच टोलवसुली करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिला आहे.

हातिवले टोलनाक्यावर टोलवसुलीस राजापूरवासीयांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी सर्व वाहतूक संघटना, नागरिकांनी एकत्रपणे पोलीस प्रशासन व महामार्ग विभागाला निवेदनही दिले आहे. महामार्ग प्रशासनाने तुर्त टोलवसुली थांबवली असली तरी ५ डिसेंबरनंतर ती सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा तालुका अध्यक्ष गुरव यांनी याला आक्षेप घेत याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही माहिती देण्यात आल्याचे गुरव यांनी सांगितले.