चिपळूण : ग्रामदैवत असलेल्या सावर्डेतील केदारनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या घटनेच्या निषेधार्थ सावर्डे बाजारपेठ बंद करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सावर्डे परिसरात असणारे केदारनाथ मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. दर्शनासाठी भाविकांची ये-जा असली तरी सायंकाळ सत्रात तेवढीशी गर्दी नसते. याचमुळे अज्ञात व्यक्तीने या मंदिरात असलेल्या देवतांच्या मूर्तीच्या मागील बाजूस कशाने तरी ओरखडा काढला. नेहमीप्रमाणे शुक्रवारी मंदिरातील पुजारी मंदिरात गेल्यानंतर मंदिराची स्वच्छता करतेवेळी या देवतांच्या मूर्तीना कोणीतरी ओरखडे काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुजाऱ्याने या घटनेची माहिती गावातील मानकरी, ग्रामस्थांना दिली. या घटनेची कल्पना सावर्डे परिसरात समजताच नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली. याची माहिती सावर्डेचे पोलीस निरीक्षक भारत धुमाळ यांना देण्यात आल्यानंतर तेही घटनास्थळी गेले. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची बैठक झाली. यानंतर या घटनेच्या निषेधार्थ सावर्डे बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी नागरिकांना केले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विटंबना करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली, या घटनेची दखल घेत पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान केली असून रत्नागिरीहून ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकासही पाचारण करण्यात आले.