मुंबई: सोशल मीडियावर स्वत:चा फोटो इतरांपेक्षा वेगळा असावा यासाठी आजकालची तरुणपीढी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अनेकवेळा काहीतरी वेगळे फोटो काढून लाईक आणि कमेंट मिळवण्याच्या नादात अनेकांना अपघाताला देखील समोरं जावं लागतं तर काहीजणांनी फोटोच्या मोहापायी आपला जीव गमावल्याच्या बातम्या देखील तुम्ही वाचल्या असतील. तरीदेखील आपला फोटो इतरांपेक्षा वेगळा असावा यासाठी अनेकजण सतत काहीतरी प्रयत्न करत असतात.
शिवाय फोटोसाठी भयंकर स्टंट करणाऱ्या अनेक तरुणाचे व्हिडीओदेखील आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण फोटो काढण्यासाठी चक्क रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बैलाची शिंगं धरताना दिसत आहे.
सुरुवातीली रस्त्यावर उभा असणारा बैल देखील त्या मुलाला चांगला प्रतिसाद देतोय, पण ज्यावेळी हा तरुण उत्साहाच्या भरात बैलाच्या शिंगावर हात ठेवून ती जोराने दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मात्र बैलाला रागवतो आणि स्टंटबाज तरुणाला एवढ्या जोराचा हिसका देतो की तो तरुण एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणे वरती फेकला गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.