रत्नागिरीतून थेट मुंबईतील जेएनपीटी बंदरात रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरु केलेल्या वातानुकूलीत कंटेनर ट्रेनमधून उद्घाटनाच्या पहिल्या फेरीत 250 मेट्रीक टन प्रक्रियायुक्त मासळी पाठवण्यात आली. अकरा कंटेनर बुधवारी (ता. 30) रवाना झाले असून रस्त्याने कंटेनर वाहतुकीतील धोके टाळण्यासळ वेळ आणि पैशांचीही मोठ्याप्रमाणात बचत होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वातानुकूलित कंटेनर ट्रेन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक संतोषकुमार झा, दिपक गद्रे, विभागिय व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून जेएनपीटीकडे रवाना झाली. या ट्रेनला अकरा कंटेनर असून गद्रे कंपनीमध्ये प्रक्रिया केलेली मासळी जेएनपीटीमधून अमेरिका आणि युरोपला निर्यात करता येणार आहे. रत्नागिरीतून ही गाडी आठ ते दहा तासामध्ये जेएनपीटी बंदरात पोचणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यावस्थापकीय संचालक संजय गुप्ता म्हणाले, वातानुकूलित कंटनरमधून थेट वाहतूक सुरु झाली असून मासळीसह अन्य निर्यात करण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी याचा उपयोग करता येईल. व्यापार वाढविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
गुप्ता म्हणाले, वातानुकूलित कंटनरमधून थेट वाहतूक सुरु झाली असून मासळीसह अन्य निर्यात करण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी याचा उपयोग करता येईल. व्यापार वाढविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
या ट्रेनमधून एकावेळी 45 कंटेनर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगलीमधून द्राक्षांसह अन्य उत्पादने वाहतुकीसाठी विचारणा झाली आहे. याप्रसंगी गद्रे कंपनीचे मालक दिपक गद्रे म्हणाले, अमेरिका, रत्नागिरी ते जेएनपीटी बंदरापर्यंतच्या रस्त्यावरुन कंटेनर वाहतूक करणे असुरक्षित आणि धोकादायक आहे. यामध्ये अधिक वेळ आणि पैसाही लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कंटेनर ट्रेनचा प्रयोग योग्य आहे. या सुविधेचा उपयोग द्राक्षाबरोबरच हापूसच्या निर्यातीसाठीही होणार आहे. अनेकवेळा जेएनपीटी बंदरामध्ये कंटेनर नेताना अडचणी येतात. ट्रेन थेट बंदरापर्यंत जात असल्याने माल लवकर पोचू शकेल. पुर्वी बोटीपर्यंत माल पोचण्यासाठी तिन दिवस लागत होते, आता आठ ते दहा तासात पोचणार आहे. तसेच ट्रक वाहतुकीपेक्षा रेल्वे भाड्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आर्थिक बचतही होणार आहे.