तळेगावात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला प्रमुख पाहुणेच 'गुल'
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे सोमवार (दि.२८) रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १३२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आयोजक समितीकडून अनेक प्रतिष्ठित मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी आयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले प्रमुख मान्यवर छगन भुजबळ व अतुल सावे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले नसल्याने प्रमुख पाहुणेच क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीला "गुल" झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लाखो रुपयांची उधळण करुन व बॅनरबाजी करून देखील आयोजक व कार्यकर्त्यांची नाराजी झाल्याचे पाहायला मिळाले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा समितीच्या वतीने महात्मा फुले उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आलेले होते, यावेळी प्रमुख नेते म्हणुन मा.उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व सहकारमंत्री अतुल सावे यांना आमंत्रित केले होते.मात्र या दोन्ही मान्यवरांबरोबर स्थानिक आमदार देखील या कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिले. तर मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाताभाभी पवार, मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सुर्यकांतकाका पलांडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पंचायत समितीच्या मा. सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषदेचे शेखर पाचुंदकर, डॉ. वर्षा शिवले, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, स्वप्नील ढमढेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
*नेते उपस्थित राहणार नसल्याची अगोदरच चर्चा*
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ वी पुण्यतिथी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले मा.उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नसल्याची चर्चा अगोदरच दोन दिवस कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.त्यामुळे केवळ नेत्यांच्या नावाचे भांडवल केले असलेच्या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.