औरंगाबाद : एका विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार करीत महिलेच्या पोटावर लाथ मारुन गर्भ पाडणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी अटक करत न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली. जयकिशन उदकराम कांबळे (वय ३१), रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी असे राजकीय पदाधिकारी असलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपीसोबत पीडितेचे ओळख झाल्यानंतर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर पीडितेच्या पतीलाही धमकावत 'तिला सोडून दे, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. आमचे एकमेकांचे प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. जर तू तिला सोडले नाही तर तुला कायमचा संपवेल' असे म्हणून पीडितेच्या पतीलाच आरोपी धमकी देत होता. त्यामुळे पीडितेला पतीने सोडून दिले. त्यामुळे पीडिता आईच्या घरी राहू लागली. त्याठिकाणी येऊनही दोन मुलांना सांभाळण्यासह लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. त्यातुन पीडितेला दिवस गेले. 

त्यानंतर लग्नाविषयी विचारल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. तसेच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. एक दविस त्याने पीडितेच्या कमरेत लाथ मारली. यात पीडितेचा गर्भपात झाला. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये आरोपी आजारी असताना त्याने पीडितेकडूनच २३ हजार रुपये उकळले. त्यानंतर त्याने पीडितेकडे येणेही बंद केले. तिच्या फोनलाही प्रतिसाद देत नव्हता. (दि. २७) नोव्हेंबर रोजी रात्री त्याने व्हाटस्अपवर व्हिडिओ कॉल करुन एका महिलेला दाखवत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

आरोपी जयकिशनने पीडितेसोबत शारीरीक संबंध करतेवेळी नकळतपणे मोबाईलमध्ये छायचित्र व व्हिडिओ काढले हाेते. ते व्हिडीओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले. अधिक तपास निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शैलेश देशमुख करीत आहेत.