परभणी, दि.२६ : भारतीय संविधान दिनानिमित्त आज शनिवारी (२६ नोव्हेंबर) रोजी समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी रॅलीला राजगोपालचारी उद्यानात हिरवी झेंडी दाखवली.

महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये आश्रम शाळा दर्गा पारवा, वसंत अनुसूचित जाती जमाती आश्रम शाळा, सैनिकी स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाबाबत जनजागृतीपर घोषणा देत जायकवाडी परिसरातील सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या रॅलीत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी, शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींची उपस्थिती होती.