मुंबई, चैत्यभूमी हे अखंड भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे ऊर्जास्थान, प्रेरणास्थान आहे. चैत्यभूमीवर दररोज देशातील विविध देशातील नागरिक आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या पवित्र स्थळावर येत असतात. याचठिकाणी अशोक स्तंभाच्या शेजारी शासनामार्फत भव्य असा राष्ट्रध्वज उभा करण्यात यावा, या मागणीसाठी लोकसत्ताक संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी अनेक आंदोलने करण्यात आली आहे. मात्र आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भव्य राष्ट्रध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मागणी संदर्भात २०१८ पासून शासन प्रशासन यांच्याशी सातत्याने पत्र व्यवहार तसेच धरणे निदर्शने करून अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मानवाधिकार, मानवतेसाठी अविरत संघर्ष केला. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले, याच तत्वावर आधारित भारतीय संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला बहाल केले, या तत्वाचे प्रतीक आपला राष्ट्रध्वज आहे. चैत्यभूमी येथे अशोक स्तंभाच्या शेजारी शासनामार्फत भव्य असा राष्ट्रध्वज उभा करण्यात यावा याबाबत संविधान दिनानिमित्त शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे पूर्ण कृती पुतळा ते दादर चैत्य भूमी अशोक स्तंभापर्यंत संविधान दिनानिमित्त (दिनांक २६ नोव्हेंबर २०२२) सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय' ही राष्ट्रवादाची भूमिका मांडणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आदर्श आहेत. त्यांची ही देशभक्तीची प्रेरणा भारतीय नागरिकांना सातत्याने मिळत रहावी. भारतीय संविधान भारतीय राष्ट्रध्वज यांचे शिल्पकार म्हणून खऱ्या अर्थाने अभिवादन व त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्मारकाच्या परिसरात चैत्यभूमी येथे अशोक स्तंभाच्या शेजारी शासनाद्वारे भव्य असा राष्ट्रध्वज उभा करण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक संविधावादी कार्यकर्त्याने रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन लोकसत्ताक संघटनेचे अमोल कुमार बोधिराज यांनी केले आहे.