संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडून रत्नागिरीकडे जाणारा तुरळ येथे उभा असणारा ट्रक दुसऱ्या ट्रकने ढकलत असताना ड्रायव्हर बसला नसल्याने थेट दुकानात घुसला. या अपघातात दुकानाचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक (एम एच ०९ क्यू ५९९२) हा लोटे येथून रत्नागिरीकडे चालला होता. सकाळी चालकाने चहा पिण्यासाठी ट्रक तुरळ येथे थांबवला असता ट्रकचा स्टार्टर लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने दुसऱ्या ट्रक चालकास मागून ट्रकने धक्का मारण्यास सांगितले. मात्र पुढच्या ट्रकमध्ये चालक बसलेला नसताना मागील ट्रकने धक्का दिला असता चालक नसलेने ट्रक जवळच असणाऱ्या दुकान लाईनमध्ये घुसला. ट्रक ज्या केशकर्तनालयात घुसला तिथे असणाऱ्या ग्राहक व दुकानदाराने समयसूचकता दाखवल्याने जीवितहानी टळली.