शिरुर: सोमवार (दि 21) नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत श्रीगोंदा व पारनेरच्या शेतकऱ्यांबाबत काही जणांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची भेट घेत त्यांची व्यथा मांडली. मंगळवार (दि 22) नोव्हेंबर रोजी निलेश लंके यांनी रात्री 8:30 च्या दरम्यान शिरुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पुढील चार दिवसात श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुरच्या शेतकऱ्यांसाठी बेलवंडी फाटा इथं पुणे- नगर रोडच्या कडेला सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी यांच्यात मार्केटची वेळ बदलल्याने संघर्ष सुरु असुन याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्यात दोनवेळा बैठक होऊनही कोणताच ठोस निर्णय झाला नाही. तसेच पहिल्यांदा (दि 16) नोव्हेंबर रोजी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोरेकर, उपाध्यक्ष सतिश कोळपे, माजी अध्यक्ष शशिकांत दसगुडे व संचालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही शेतकऱ्यांनी मार्केटची वेळ हि पहाटे 2 ची तर बहुसंख्य शेतकऱ्यांनी वेळ सायंकाळी 6 ची ठेवा अशी मागणी केली होती. त्यावर आमदार पवार यांनी मध्यस्ती करत दोन दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर निर्णय घ्यावा असे सांगितले होते. 

त्यानंतर कृषी उत्त्पन्न बाजार समितीने निर्णय घेत एक परिपत्रक काढुन सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यात मार्केट सोमवार ते गुरुवार रात्री 8:30 ते 10 पर्यंत, शुक्रवार सुट्टी आणि शनिवार व रविवार पहाटे 4 वाजताची वेळ निश्चित केली. शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध करत मार्केट हे संध्याकाळी 6 वाजताच ठेवा असा सुर लावला आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या परिपत्रकाला न जुमानता सायंकाळी 6 वाजताच बाजार भरविण्यास सुरवात केली. त्यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद, शेतकरी प्रतिनिधी नाथा पाचर्णे यांनी शिरुर पोलिसांना निवेदन दिले आणि यात माध्यस्ती करण्याची विनंती केली. 

त्यानंतर (दि 21) नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही शेतकरी मुद्यावरुन थेट गुद्यावर आल्याने दोन गटात खडाजंगी झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार भरविण्याची वेळ रोज पहाटे 4 ची वेळ निश्चित केल्याने तसेच शिरुरच्या काही शेतकऱ्यांनी श्रीगोंदा व पारनेरच्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी थेट निलेश लंके यांना संपर्क साधुन आपली कैफियत मांडली. त्यामुळे (दि 22) रोजी सायंकाळी 8:30 च्या सुमारास पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा दिला. तसेच श्रीगोंदा आणि पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी चार ते पाच दिवसात बेलवंडी फाटा येथे पुणे-नगर महामार्गालगतच सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

शिरुरच्या नेत्यांना जमलं नाही ते पारनेरच्या आमदारांनी केलं....

शिरुर तालुक्यात प्रत्येक पक्षाचे ढीगभर नेते आणि डझनभर सामाजिक कार्यकर्ते असताना ऐन थंडीच्या दिवसात शेतकऱ्यांसाठी पहाटे बाजार भरविण्यात येईल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयाला कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे 'सारा गाव मामाचा, पण एक सुद्धा नाय कामाचा' या म्हणीचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला. नुकतीच शिरुर तालुक्यात घोडगंगा साखर कारखान्याची निवडणुक झाली. या निवडणुकी दरम्यान शेतकऱ्यांच्या दारात मताचा जोगवा मागायला जाणारे सत्ताधारी अथवा विरोधक यांनी निवडणुकीनंतर काही ठराविक 'मूठभर' लोकांसाठी शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळाले. परंतु श्रीगोंदा आणि पारनेरच्या शेतकऱ्यांसाठी आमदार निलेश लंके यांनी मात्र एक ठोस भुमिका घेत त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.