रत्नागिरी : जिल्ह्यात पुरेशा अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी कोल्हापूर, मुंबईला हलवण्याचा स्थानिक डॉक्टरच सल्ला देतात. मोठ्या पेशंटसह, लहान मुलांच्या बाबतीतही डेरवण, कोल्हापूरला पाठवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (NICU) उभारण्याकरिता पुढाकार घेतला आहे. नवजात बालकांसाठी बीपी, कफ आणि तपासणीसह मल्टीपॅरा मॉनिटर, ऑटोक्लेव्ह मशीन, स्कॅनर, अंतःस्रावी स्टाइलेट, शिशु तपासणीसह पल्स ऑक्सिमीटर, व्हिडिओ लॅरींगोस्कोपसह, पुनर्जीवन किट, पृष्ठभाग फोटोथेरपी युनिट अंतर्गत स्टेथोस्कोप, इनबिल्ट कंप्रेसरसह बबल सीपीएपी व्हेंटिलेटर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची उपकरणे असतील.

रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. ती रत्नागिरीमध्ये मागील ६५ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करीत आहेत. मागील दोन वर्षात, कोरोनाच्या कालावधीत क्लबतर्फे अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावर जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. येथे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा व उपचार समाजातील सर्व घटकांसाठी अल्प किंवा मोफत स्वरूपात पुरवल्या जातात.

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बालकांसाठीचा दक्षता विभाग अद्ययावत करतानाच अतिदक्षता विभाग देखील करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बालकांना जिल्ह्यातच सेवा, उपचार मिळावेत आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या हेतू पुरस्कर रोटरी क्लबने यामध्ये विशेष लक्ष घातले आहे. या संदर्भातील माहिती अध्यक्ष राजेंद्र घाग आणि सचिन सारोळकर यांनी दिली आहे.

मागील पाच वर्षात रुग्णालयातील आजारी बालकांसाठी दक्षता विभाग उत्कृष्टपणे कार्य करीत आहे. या विभागात नवजात बालकांसाठी विशेषतः विविध कारणाने, आजाराने पीडितांची काळजी घेतली जाते. उपचार केले जातात. यात कमी वजनाचे, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर विशिष्ट आजार झालेल्या बालकांचा यामध्ये समावेश असणार आहे.