राजापूर : तालुक्यातील बारसू- सोलगाव पंचक्रोशीत चर्चेत असणारा रिफायनरी विरोधी संघर्ष वाढत आहे. आज मंगळवार दि. २२ रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे रिफायनरी प्रकल्पाबाबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आ. राजन साळवी यांच्यासहित महसूल आणि एमआयडीसीचे अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीवरुन बारसू सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून 'ती' बैठक म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांची नौटंकी असून आम्हाला 'रिफायनरी'च नको, त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेण्याची उद्योगमंत्र्यांची आम्हाला गरज नाही असे ठणकावले आहे. दरम्यान, राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी हे कदर रिफायनरी समर्थक असून ते कंपनीचे दलाल असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान शिवसेना खा. विनायक राऊत यांनी आपला शिवसेना 'बाणा' दाखवत बारसू- सोलगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, रिफायनरीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटात शिवसेनेत उभी फूट पडलेली दिसून येत आहे.

आतापर्यंत दीड वर्षाहून अधिक काळ रिफायनरी विरोधी संघर्ष करत असलेली कोकणातील जनता उद्योगमंत्री उदय सामंत आणि आ. राजन साळवी यांना कुठेच दिसली नाही. परंतु रिफायनरी विरोधी संघर्षचे मुंबईचे सरचिटणीस नरेंद्र उर्फ अप्पन जोशी यांनी रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या पुढाऱ्यांबाबत आवाज उठवताच पोलीस यंत्रणेसह मंत्री आणि प्रशासनाला चांगलीच जाग आली होती. त्यामुळे बारसू- सोलगाव पंचक्रोशीत रिफायनरीला विरोध असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर स्थानिक रिफायनरी विरोधी ग्रामस्थांवर खोट्या केसेस, तडीपारीच्या नोटिसा, पोलिसांची दंडुकेशाही हे सर्व प्रशासनाला हाताशी धरून जिल्हा प्रशासनाने 'उद्योग' सुरु केले.

दरम्यान, बारसू सोलगाव पंचक्रोशीतील नागरिकांना 'रिफायनरी'साठी विश्वासात घेण्यासाठी कुणी येणार असेल तर त्यांचे नक्कीच 'नाणार' सारखे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले जाईल. सोबत राजापूर लांजा मतदरसंघांचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांनी घेऊन यावे, त्यांना नाणार पंचक्रोशीत स्वागताचा चांगलाच अनुभव आहे. असे ही बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे रिफायनरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी असल्यासारखे वागत आहेत. आज त्यांनी देवाचे गोठणे, शिवणे खु. व सोलगाव ही गावे वगळण्याची घोषणा केली. तसेच जमिनीला जास्त दर व पॅकेज घोषित करण्याबद्दल आणि जनजागृतीबद्दल बोलले. मात्र हे सर्व पॅकेज नेमके हवे कोणाला? एवढं समजायला आम्ही कोकणी माणूस दूध खुळी नाही.

उद्योग मंत्री आणि प्रदूषण विनाशकारी रिफायनरी हा विषय केवळ जागा मालकांचा नाही तर कोकणच्या पर्यावरण अस्मितेचा आहे. त्यामुळे आमचा या तेलकट विणाषकारी रिफायनरीला विरोधच आहे. असे बारसू सोलगाव विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

◽कही गाव वगळा, परंतु - सोलगाव पंचक्रोशी आपले हे 'कटू' कारनामे ओळखून आहेत. आपण जे गाव वगळण्याचा प्रयत्न केला, हे स्वार्थी हेतूने केलेले असून गावागावात वाद लावण्याचे प्रयत्न आहेत. आमची एकी तोडण्याचा प्रयत्न आहे. परंतु, आपले हे स्वप्न आम्ही कधीच पूर्ण करायला देणार नाही. आम्ही रिफायनरी विरोधी हा लढा एकजुटीने करणार आहोत आणि कोकणात रिफायनरी होऊच देणार नाही.

अध्यक्ष अमोल बोळे - रिफायनरी विरोधी संघटना