खेड लोटे औद्योगिक वसाहतीच्या बंद पडलेल्या दोन कारखान्यातुन सुमारे तीन कोटीच्या लोखंडी साहित्यावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या या भंगार चोरीबाबत तीन वर्षानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यासंबधी खेड पोलिसात वैभव आंब्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अनेक मोठे मासे गुंतले असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची पत्रकार परिषद झाली होती. तेव्हा कदम यांनी पत्रकारांना या चोरीबाबत माहिती देत सीआयडी चौकशी लावणार असल्याचे सांगितले होते. कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतरच यासंबधीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार लोटे औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्या बंद आहेत. त्या कंपन्यामधील सुमारे तीन कोटी रुपयांचे साहित्य दोन क्रेन आणि दोन ट्रक चालक, मालकांनी राजकीय नेत्यांच्या संगणमताने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबधितांनी इमारतीची तोडफोड करून कंपनीतील मशिनरी व इतर लोखंडी साहित्य गॅस कटरच्या साह्याने ट्रकमधून चोरून नेल्याचे फिर्यादत नमूद करण्यात आले आहे. खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुजित गडदे हे अधिक तपास करीत आहेत. एका दिवसाचा प्रकार नव्हे...एखाद्या कंपनीत राजरोसपणे शिरून कंपनीतील साहित्य गॅस कटरच्या साह्याने कापून ते चोरून नेणे सहज शक्य नसल्याने यामध्ये अनेकजण गुंतले असावेत असा संशय आहे. एवढी मोठी चोरी ही एका दिवसात झालेली नाही. कित्येक दिवस हा चोरीचा प्रकार सुरु असावा मग या चोरीचा सुरक्षा यंत्रणांना सुगावा कसा लागला नाही. ज्या कारखान्यातील साहित्य चोरीला गेले त्या कंपनी मालकांनी देखील आपल्या कारखान्यातील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार का दाखल केली नाही. याबाबत चर्चा सुरू असून याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे