पुणे: पिंपरी येथे बारावीत शिकणार्या राहुल पाटसकरने सोशल मीडिया आणि यू-ट्यूबवर पाहून एक ईलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. त्याला ही बाईक बनविण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला असून 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. पिंपरी-चिंचवड येथे राहणार्या राहुलला लहानपणापासूनच विविध संशोधन करुन काही ना काही तयार करण्याचा छंद आहे.
या वयात अनेक मुले मोबाईल गेम्स, इन्स्टाग्राम व्हिडिओच्या आहारी जाऊन आपला वेळ वाया घालवतात. पण, त्याकडेच राहुलने पाठ फिरवून मोबाईलचा वापर संशोधनात्मक कामासाठी केला आहे. याच मोबाईलच्या मदतीने यू-ट्यूब आणि आणखी माहितीच्या संकेतस्थळांवरुन अभ्यास करुन एक ई-बाईक साकारली आहे. त्याला या कामासाठी त्याच्या वडिलांनी आर्थिक मदत केली.
बाईक चार्जिंग करण्यासाठी राहुल 3 ते 15 अॅम्पीअरपर्यंतचे चार्जर वापरतो. चार्जिंगसाठी त्याला सुमारे 1 ते दीड तास लागतो. एका चार्जमध्ये त्याची बाईक 30 ते 40 किलोमीटरपर्यंत धावू शकते. परंतु, आरटीओच्या नियमांचे पालन करून, ही बाईक प्रोजेक्ट बाईक असल्यामुळे तिला अजिबात रस्त्यावर उतरवत नाही, असे राहुलने सांगितले.
अशी आहे बाईक
बॅटरीवर धावणारी.
धावण्यासाठी मोटार जोडण्यात आली आहे.
वेग तासाला 45 किलोमीटरपर्यंत
वजन 50 किलो
रिअर आणि
डिस्क ब्रेक
मला नवनवीन संशोधन करण्याची आवड आहे. मी आणखी विविध वस्तू बनविणार आहे. मोबाईलवर गेमिंगसाठी वेळ वाया घालविण्यापेक्षा इतर मुलांनीही मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर करायला हवा.