लांजा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी हे नेहमी आमच्या महामनवांबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांनी या आगोदर महात्मा जोतिबा फुले व राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या बद्दलही वादग्रस्त विधान केले होते.
तसेच नागपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना नितीन गडकरी यांच्या बरोबर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे काल, आज, उद्या व नेहमी आदर्श आहेत. त्यांची तुलना कोणासोबत ही होवू शकत नाही.
तरी घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी असे विधान करून दोन समाज्यामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे आम्हांस वाटते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांतता भंग होवू शकते. तरी या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याच बरोबर भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देताना ग्रामीणचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव- सालपेकर, कार्याध्यक्ष लहू कांबळे, सल्लागार दिलीपभाई कांबळे व दाजी गडहिरे उपस्थित होते.