पुणे: अचानकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यासाठी कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव कार उलटली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला, तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले. नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासणे शिवारातील बांबळेवाडी येथे हा अपघात झाला.
विजय शंकर डेरे (वय 62), रा. नारायणगाव, जि. पुणे) असे मृताचे नाव असून, कारमधील रोहित विजय डेरे (वय 23), उज्ज्वला विजय डेरे (वय 48), मोहित विजय डेरे (वय 30), सविता अनिल शेटे (वय 48), शैला दिलीप वारुळे (वय 58), विनायक शिवाजी डेरे (वय 50), सर्व रा. नारायणगाव, पुणे, शोभा दशरथ वायाळ (वय 54), रा. नांदुर, नाशिक यांच्यासह रस्ता ओलांडणारी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय 12), सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ रा. पाटगाव, आळेफाटा, जि. पुणे अशी जखमींची नावे आहेत.
नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कारमधून नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. दरम्यान, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता, वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकामध्ये असलेल्या झुडपातून रस्ता ओलांडण्यासाठी अचानक रस्त्यावर आली. त्यावेळी कारचालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी अचानक कारचा ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा उलटून 500 मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटले असून, मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला, तर रस्ता ओलांडणाऱया वैष्णवी मेंगाळ या मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी, पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे, योगिराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे रस्त्यावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती. महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.