भंडारा: तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा बुडुन मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली आहे. मृत्यू झालेली महिला ही 9 महिन्याची गरोदर होती. त्यामुळे तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी इथं ही दुर्दैवी घटना घडली. राजकुमारी सुनिल नेवारे (वय 30) असं मृत महिलेचे नाव असून ती 9 महिन्याची गर्भवती होती. नेहमी प्रमाणे सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी राजकुमारी नेवारे ही महिला गेली होती. कपडे धुत असताना अचानक पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. राजकुमारी नेवारे यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला पण जवळपास कुणीच नसल्यामुळे मदतीला कुणी धावून आल नाही. पाण्याची पातळी खोल असल्यामुळे या महिलेचा बुडून मृत्यू झाला.

सासू शेळ्या चारुन घरी आली तेव्हा सून घरी दिसली नाही. त्यांनी शेजारी आणि गावात विचारपूस केली पण कुठेच पत्ता लागला नाही. त्यांना तलावावर कपडे धुण्यासाठी सून गेल्याच कळल. तलावावर धाव घेऊन राजकुमारीला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली. काय घडलं याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला. गावकऱ्यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून राजकुमारीला करडी येथील दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती करडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

राजकुमारी 9 महिन्याची गरोदर होती. त्यामुळे गरोदर अवस्थेत मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे मिरज लोहमार्गावर रेल्वेची धडक बसल्याने एकाचा मृत्यू दरम्यान, पुरंदर तालुक्यातील पुणे मिरज मार्गावर पिसूर्टी येथे रेल्वे मार्गावर रेल्वेची घडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 11 वाजलेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटली नसून मृत व्यक्तीने चौकड्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे शरीराचे अनेक तुकडे झाल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहे. या भागतील कोणाच्या घरातील व्यक्ती हरवली असल्यास जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे.