रत्नागिरी : तीन वर्षांपूर्वी बकर्या चरवण्यासाठी गेलेल्या मैथिली प्रविण गवाणकर (रा.चिंचवाडी खेडशी,रत्नागिरी) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घूण खून झाला होता. या आरोपातून सबळ पुराव्या अभावी गुरुवारी न्यायालयाने संशयित तरुणाची निर्दोष मुक्तता केली.
निलेश उर्फ उक्कु प्रभाकर नागवेकर (35, रा. खेडशी भंडारवाडी,रत्नागिरी) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मैथीलीचे वडिल प्रविण सिताराम गवाणकर (43, रा.खेडशी भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास त्यांची मुलगी मैथिली ही बकर्या चरवण्यासाठी खेडशी येथील मोडा जंगल परिसरात गेली होती. सायंकाळी 6 वा. बकर्या घरी परतल्या होत्या परंतू मैथीली घरी न परतल्याने तिच्या आईने ही बाब प्रविण गवाणकर यांना सांगितली. त्यांनी मैथीलीच्या मोबाईलवर फोन केला परंतू ती फोन उचलत नव्हती. म्हणून त्यांनी जंगलात जाउन पाहिले असता त्यांना मैथीली कुठेही दिसून आली नाही.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांना चेहरा विद्रुप झालेल्या अवस्थेतील मैथीलीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी तपास केल्यानंतर ग्रामीण पोलिसांना ज्यावेळी मैथीली जंगलात बकर्या चरवण्यासाठी गेली होती तेव्हा निलेशने तिची एक बकरी उचलून घेतली होती. त्यावेळी मैथीलीने ‘तु आमच्या बकर्या चोरतोस काय? बकरी सोड, नाहीतर मी गावात सर्वांना तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोस असे सांगेन’, असे निलेशला सांगितले.आपली बदनामी होईल या भितीने निलेश तिथून निघून गेला होता. परंतू काहीवेळाने त्याने मैथीलीच्या पाठीमागून जाउन तिच्या डोक्यात दगड मारुन तिला ठार मारले होते असा त्याच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला न्यायालयात सुरु होता. संशयित आरोपीतर्फे अॅड. मुदस्सर डिंगणकर यांनी 4 साक्षिदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी निलेशची निर्दोष मुक्तता केली.