शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या टप्पा क्रमांक तीनसाठी करडे-सरदवाडी या गावातील जमिनी शासनाने संपादित केल्या असुन या ठिकाणी सध्या काम सुरु झाले आहे. यामध्ये नव्याने सुरु होत असलेल्या स्टेरेऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सपाटीकरण करण्याचे काम चालु असुन या कामासाठी करडे येथील सरकारी गायरान गट नंबर 166 तसेच यालगत असणाऱ्या जमिनीतुन अंदाजे 20 हजार ब्रास मुरुम पोकलेनच्या साह्याने बेकायदेशीररीत्या चोरुन नेल्याची तक्रार येथील एका जागरुक नागरिकाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

रांजणगाव MIDC च्या तिसऱ्या टप्प्यासाठी करडे घाट येथे शासनाने जमीन संपादित केली असुन गेल्या सहा महिन्यांपासुन या जागेवर सपाटीकरण व इतर कामे चालु आहेत. परंतु सध्या सपाटीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारा मुरुम हा करडे येथील सरकारी गायरान गट नं 166 तसेच आसपासच्या गटातून चोरुन आणला जात असुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असताना स्थानिक तलाठी, मंडलअधिकारी नक्की काय करतात. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. करडे येथील मुरुम चोरीबाबत गेल्या सहा महिन्यापासुन जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रारी करुनही मुरुमचोरी थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे.

शिरुर तहसिल कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...?

शिरुर तालुक्यातील अनेक गावात गायरान जमिनीवर अतिक्रमण, गायरान जमिनीतील मुरुम विकणे, शासकीय जागेतील मुरुम चोरुन बेकायदेशीररीत्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्याना विकणे हे प्रकार दिवसाढवळ्या चालु असताना महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत असुन महसूल विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासुन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच 'म्यानेज' असल्याने या मुरुम चोरांवर कसलीच कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा चालु आहे.