शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार  यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  पॅनेलने रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड.अशोक पवार हेच कारखान्याचे चेअरमन होतील,असे गृहित धरले जात असतानाच आज अनपेक्षितपणे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी ऋषिराज पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाइस चेअरमनपदी पोपटराव भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी जाहीर केले

आमदार अशोक पवार यांनी नव्या पिढीकडे कारखान्याची सूत्रे सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला  घोडगंगा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ निवडणूकीत आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने वीस पैकी १९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तर ऋषिराज पवार यांची ब वर्ग मतदार संघातून संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली होती.

या निवडणूकीनंतर, आमदार पवार हेच पुन्हा अध्यक्ष होणार, अशी सर्वच पातळ्यांवर चर्चा सुरू असताना ऋषीराज पवार यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालत सर्वांना धक्का दिला.

आमदार अशोक पवार यांनी सलग २५ वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवित  कारखान्याची प्रगती, विस्तार व इतर प्रकल्पांतून विकास साधला होता. त्यामुळे तेच पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील अशी राजकीय स्थिती होती. त्यांच्या निवडीचे केवळ सोपस्कार बाकी असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व शक्याशक्यता मोडून काढत आमदार पवार यांनी ऋषिराज पवार यांच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी दिली.