रत्नागिरी : दि. १४ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाचे सर्वेसर्वा राजपुत्र सलमान भारत दौऱ्यावर येणार होते. परंतु त्यांचा हा भारत दौरा अचानक रद्द झाला. मात्र रिफायनरी समर्थकांनी राजपुत्र सलमान यांच्या भारत दौऱ्यामुळे कोकणात लगेच रिफायनरी प्रकल्पाची घोषणा होणार असं वातावरण तयार केले. त्यासाठी रत्नागिरी आणि राजापूर शहरात प्रिन्स सलमान यांचे भारतभूमीमध्ये हार्दिक स्वागताचे बॅनरबाजी केली. परंतु सौदी अरेबियाचे 'ते' प्रिन्स सलमान भारतात आलेच नाहीत. रिफायनरी समर्थकांनी लावलेले प्रिन्स यांचे ते स्वागताचे बॅनर शोभेचे बाहुले झाले. यातून पुन्हा एकदा रिफायनरी समर्थकांनी हस करून घेतल्याचे दिसून आले. इंडोनेशियात जी -२० 'समिट' येथे जाताना सौदी अरेबियाचे राजपुत्र सलमान दिल्लीत थोडा वेळ उतरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. त्यामुळे रिफायनरी समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्या उत्साहाच्या भरात रत्नागिरी व राजापुर येथे रिफायनरी समर्थकांनी प्रिन्स सलमान यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. पण राजपुत्र सलमान यांचा भारत दौराच काही कारणाने रद्द झाला व 'त्या' उसन्या रिफायनरी समर्थकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.
पूर्वी नाणार परिसरात प्रस्तावित असणारी पण तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याने रद्द झालेली रिफायनरी नवीन ठिकाणी म्हणजेच बारसू सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी बारसू सोलगाव पंचक्रोशीत दडपशाही केली जात आहे. या रिफायनरी व पेट्रोकेमिकल संकुलात सौदी 'अरामको' या सौदीच्या राजाच्या मालकीच्या कंपनीची ५०% भागीदारी आहे. २०१७ मध्येच यासाठी प्राथमिक करार करण्यात आला आहे. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे ही रिफायनरी नाणार पंचक्रोशीत होऊ शकलेली नाही.
रिफायनरी आल्यावर जमिनीला जास्त भाव मिळेल, गुंतवणुकीत १०-१२ पट फायदा मिळेल, कंत्राट मिळतील, निवडणूक फंड मिळेल या आशेने रिफायनरीचे समर्थन देणाऱ्या दलालांकडून 'नाना' प्रकार केले जात आहेत. पण आजही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, यापुढे असे रिफायनरी समर्थनाचे बॅनर लावायचे का नाहीत असा संभ्रम रिफायनरी समर्थकांना पडला आहे.