पुणे: मुलाने व्यसनाच्या आहारी जाऊन आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात घडली आहे. मुलाने आईकडे तंबाखू घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला.
जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे ही घटना घडली आहे. घटनेनंतर पोलिसांकडून संबधित मुलाला अटक करण्यात आली आहे. अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून अमोल बारकु खिल्लारी (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पती बारकू सखाराम खिलारी यांनी फिर्याद दिली आहे.
रागातून आईचाच पाडला मुडदा
अमोल याला तंबाखू खाण्याचे व्यसन होते. तो बेरोजगार होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास आई घरात एकटी होती. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचा फायदा घेत त्याने तंबाखू आणण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी आईने त्याला सांगितले की, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर अमोल म्हणाला तू तंबाखूसाठी पैसे दिले नाही तर मी घर सोडून निघून जाईल, अशी धमकी त्याने आईला दिली. आई त्याला म्हणाली, तुला जायचे तिकडे जा, माझ्याकडे पैसे नाहीत. या गोष्टीचा राग अमोलच्या मनात बसला. त्याने रागाच्या भरात घरात असलेले खोरे आईच्या डोक्यात घातले. तो घाव आईच्या जिव्हारी लागला आणि त्यातच तिचा जागेवरच मृत्यू झाला.