पुणे: महाराष्ट्रात आता तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता 51 टक्क्यांशी लढाई करावी लागणार आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वेळ काढला पाहिजे. आगामी निवडणुकीत घड्याळ बंद पडलेच पाहिजे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

येरवडा येथे भाजपच्या वतीने बावनकुळे यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ व अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले की, सर्वोत्कृष्ट नेता म्हणून जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मान्यता दिली आहे. असे असूनही महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा निवडून आले नाही, ही खंत दिल्लीतील नेतृत्वाची आहे. आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष बनेल, असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. येत्या निवडणुकांमध्ये घड्याळ बंद पडलेच पाहिजे, असा निर्धार करून रोज दोन तास वेळ पक्षासाठी द्यावा. पक्षाची ध्येयधोरणे, केंद्राच्या व राज्याच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, निवडणुका लांबल्याने नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेणे बंद केले आहे. सर्वच निवडणुका आपण जिंकणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस जशी आपण संपवली, तशी राष्ट्रवादीदेखील संपविण्याचा निर्धार आपण केला पाहिजे.