जुन्नर: शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील 60 वर्षीय महिलेच्या डोक्यात सख्या मुलाने शेतात पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोऱ्याचा डोक्यात घाव घालून खून केला आहे. अंजनाबाई बारकू खिल्लारी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना (दि. 15) दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत सख्या मुलावर आईच्या खून प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी अमोल बारकू खिल्लारी (वय २३) रा. शिरोली तर्फे आळे, (ता. जुन्नर) याला अटक करण्यात आली असून हा मुलगा मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान खून झालेल्या महिलेचे पती बारकू सखाराम खिल्लारी (वय ६६) यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून संबंधित मुलाला तंबाखू साठी आईने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात खोरे घातले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.