शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

याबाबतची घोषणा लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे मंगळवारी सकाळी दहा वाजताहोणाऱ्या पत्रकार परिषद व शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित होणार आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिव सेनेच्या बालेकिल्लाला सुरुंग लागला आहे. त्यांच्या समवेत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहेत. शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक लांडेवाडी येथे मंगळवारी बोलवण्यात आली असून सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही आढळराव पाटील यांनी फेसबुक द्वारे केले आहे.

सन 2004 पासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळराव पाटील यांनी शिवसेनेची मोठी ताकद उभी करण्याचे काम केले आहे. सलग तीन लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटबंदी बालेकिल्लाला जबरदस्त धक्का देऊन तेथे दणदणीत विजय संपादन केला. दांडगा संपर्क अशी त्यांची ख्याती आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर अचानकपणे आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे आढळराव पाटील व त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. या विषयी आढळराव पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आढळराव पाटील यांची असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्या मुळे आढळराव पाटील शिवसेनेबरोबर काडीमोड घेऊन शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा होतीच.

सोमवारी शिंदे गटाच्या शिवसेना यादीमध्ये उपनेते म्हणून आढळराव पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. याबाबत आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले"माझी नियुक्ती झाली आहे. मंगळवारी लांडेवाडी येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. पत्रकार परिषद आढळराव पाटील कोणावर हल्लाबोल करणार व त्यांच्यासमावेत अजून कोणते नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार याविषयी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जुन्नर, आंबेगाव ,खेड ,शिरूर हडपसर, हवेली भागातील अनेक पाटील समर्थक शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील अशी चर्चा सुरू झाली आहे