परभणी,दि.12 प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा श्रीमती यु.एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आज एकुण 733 प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी 32 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून अनेक दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. प्रलंबित 7 हजार 839 प्रकरणांसोबतच विशेष मोहिमेच्या माध्यमातून 442 आणि वादपूर्व 8 हजार 511 प्रकरणे अशी एकूण 9 हजार 686 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 7 हजार 839 प्रलंबित प्रकरणांमधून 733 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 6 कोटी 19 लाख तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व 25 हजार 688 दाव्यापैकी 8 हजार 511 दावे निकाली काढून 5 कोटी 4 लाख 47 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण 9 हजार 244 दावे निकाली काढण्यात येऊन 11 कोटी 23 लाख रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.
तसेच विशेष मोहिमेअंतर्गत 494 दावे सुनावणीसाठी घेण्यात येऊन त्यापैकी 442 दावे निकाली काढण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. जी. लांडगे यांनी सांगितले.