रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली. शहर पोलिस स्थानकापाशी आणलेला चोरटा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याने पोलिसांची धावपळ उडाली आहे. दत्तात्रय शिवाजी गोडसे (सोलापूर) असे फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शनिवार 12 नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी गोडसे याला पकडुन शहर पोलिस स्थानकात घेऊन येत होते. हा चोरटा सराईत गुन्हेगार आहे. रेल्वे मध्ये घडणाऱ्या मोबाईल चोरी प्रकरणात पोलिसांनी या चोरट्याला सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्याचे हात दोरीने बांधून रेल्वे पोलीस आज रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दुपारच्या सुमारास घेऊन जात होते. मात्र पोलिस स्थानकासमोर पोलिसांच्या हाताला हिसका देऊन दोरी सहित पळ काढला. आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निसटताच पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. चोर पोलिसांचा पळापळीचा खेळ सुरू झाला. भर बाजारपेठेतून चोर पुढे पोलिस मागे असा धावपळीचा खेळ चांगलाच रंगला होता. मात्र त्यानंतर देखील चोरटा दिसून आला नाही. आता मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.