लग्नाचे आमिष दाखवून सुमारे सात लाख रुपये तरुणीकडून उकळणाऱ्या महाठगास लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले आहे.
इन्स्टाग्राम वरील त्याच्या फोटो मागील फ्लॅटच्या गॅलरीच्या भागाच्या फोटोचा आधार घेत त्याला पकडण्यात लोणीकंद पोलिसाच्या पथकाला यश आले आहे .
राकेश कुमार हकींगसिंग चहर ( वय 36, सध्या रा. हडपसर, मूळ गाव - उत्तर गोवा ) असे आरोपीचे नाव असून. तो विवाहित असतानाही त्याने शादी डॉट कॉम या साईटवरून तरुणीची ओळख केली. मी तुझा होणारा नवरा आहे असे भासवून भावनिक संबंध वाढविले. यानंतर आईस्क्रीम व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून तिच्याकडून सात लाख रुपये घेतले. तिला संशय आल्याने तिने पैसे परत मागितले. त्याने तिला शिवीगाळ करून आपले दोन्ही मोबाइल बंद केले. मोबाइल बंद असल्याने त्याला शोधणे कठीण होते. मात्र पोलिसानी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरील फोटो मिळविला. त्या फोटोत फ्लॅटच्या गॅलरी चा काही भाग दिसत होता. त्यावरून पोलिसानी शोध घेत त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, सुभाष भुरे, दीपक कोकरे यांनी ही कामगिरी केली.
याबाबत अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी केले आहे