महाराष्ट्रातील पुन्हा एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. बल्क ड्रग पार्क हा 400 कोटींचा प्रकल्प राज्य सरकार पदरात पाडून घेण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. या प्रकल्पासंबंधीच्या सर्व प्रक्रिया महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्यावतीने उर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्यांकडून निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. या प्रकल्पासाठी केंद्राचं 400 कोटीचं अनुदान मिळणार होतं. महाराष्ट्र, बिहार, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि उडिसा या राज्यांनी निविदा सादर केल्या. मात्र गुणांच्या आधारावर हे उर्जा निर्मितीचे क्लस्टर मिळाले. 13 एप्रिल 2022 रोजी या क्लस्टरसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. 8 जून 2022 ही निविदेची अंतिम तारीख होती. या निविदेवर महाराष्ट्राच्या एमआयडीसीने केंद्राशी पत्रव्यवहार केला होता. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळू शकला नाही. ही सर्व कार्यवाही महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

'बल्क ड्रग पार्क'साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. हा प्रकल्प देखील आपण रायगड आणि इतर परिसरात आणणार होतो. यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा 'बल्क ड्रग पार्क' होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. या काळात सध्याचे मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटी देत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. पण या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल की, हा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रासाठी उपयोगी होता त्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता, तो महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. हे किती खरं आणि किती खोटं याचं उत्तर मला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षित असल्याचे आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रे दरम्यान म्हणाले होते.