चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात सावर्डेत सिंगल पिलर पूल उभारण्याची मागणी मागे पडल्याने अखेर १० नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात चौपदरीकरणाला प्रारंभ करण्यात येत आहे. त्यासाठी ठेकेदार कंपनीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सावर्डेतील काही पदाधिकाऱ्यांनी चौपदरीकरणातील गटाराचे काम आधी करून मगच सर्व्हिस रोड करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली; मात्र ती फेटाळण्यात आली. एका बाजूचे काम वादामुळे बंद होते. त्यामुळे तिथेही काम सुरू केले जाणार आहे. महामार्गावरील सावर्डे गाव परिसरातील 54 गावांचे केंद्र आहे. येथील बाजारपेठ मोठी असून रस्त्याला लागून काही दुकाने आहेत. त्यासाठी सुरवातीला व्यापारीपेठेमुळे उड्डाणपुलाची मागणी होत होती; मात्र ती मागे पडल्याने आता थेट चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंत्राटदार कंपनीकडून तयारी करण्यात आली आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे असल्यास अशी बांधकामे संबंधितांनी १० नोव्हेंबरपूर्वी काढून घ्यावीत, असे आवाहन कंपनीकडून काही दिवसांपूर्वीच केले होते; मात्र तरीही कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त मागवला आहे.