कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
मागील तब्बल 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोरेगाव भीमा येथील फरशी ओढा ते नरेश्वर वस्ती या रस्त्याचा प्रश्न विद्यमान सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून या रस्त्याच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील प्रभाग क्रमांक पाच मधील फरशी ओढा ते नरेश्वर वस्ती या रस्त्याचा प्रश्न मागील 20 वर्षांपासून प्रलंबित होता. या भागात चांगल्या प्रकारचे रस्ते नसल्याने नागरिकांना, विद्यार्थ्यांना व कामगार वर्गाला भर पावसात चिखल तुडवत पुणे नगर महामार्गावर यावे लागत होते. वाढत्या नागरीकरणाने या भागात पाच ते सहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढल्याने या ठिकाणी रहदारी वाढली. तसेच पुढे याच रस्त्याने नरेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक भाग शाळा असल्याने या भागात तातडीने रस्ता व्हावा अशी मागणी देखील जोर धरत होती. अखेर विद्यमान सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दीपक गव्हाणे, मनीषा संपत गव्हाणे यांनी पाठपुरावा करत पहिल्या टप्यातील 360 मीटर रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला. अखेर 3 मीटर रुंद व 360 मीटर लांबीचा रस्त्याचे काम सुरू झाले असून यातील 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे ठेकेदार महेश गव्हाणे यांनी सांगितले. तर या भागात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत चे आभार मानत भविष्यात या भागातील नागरिकांच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना तयार करावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली. तर गावातील व वाड्या वस्त्यांवर नागरिकांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून चांगले रस्ते, स्ट्रीट लाईट, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यावर प्रशासन भर देणार असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी सांगितले.
यावेळी अँड. सचिन गव्हाणे, उद्योजक दशरथ गव्हाणे, जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश गव्हाणे, माजी अध्यक्ष दीपक गव्हाणे यांच्यासह इतर उपस्थित होते.