रायगड : चौपदरीकरणाचे काम रखडलेले आणि दुरवस्था झालेल्या मुंबई- गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर ११ वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला.

मुंबई- गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्त्रकारांनी मुंबई - गोवा महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. रायगडमधील पत्रकारांसह समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी या वेळी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, गजानन नाईक, मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा पत्रकार संघाचे नागेश कुलकर्णी, अभय आपटे, विजय मोकल, अनिल भोळे आदी उपस्थित होते; तर आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, रोहा सिटिझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख आदींसह विविध सामाजिक संघटनांनी या वेळी उपस्थित राहून आंदोलनात आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. साडेअकरा वाजता महामार्गावर मानवी साखळी करण्यात आली. अर्ध्या तासाने महामार्गाचे प्रकल्प संचालक यशवंत व्होटकर हे रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्यासमवेत आंदोलनस्थळी आले. येत्या एक महिन्यात रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने या विषयावर बैठक घेण्याचे ठरले. तसेच पुढील एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचे अल्टिमेटम या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

आम्ही सनदशीर मार्गाने या रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहे. पुढील एक महिन्यात मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. कोकणातील पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारतील.

- एस. एम. देशमुख, मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद

 शिंदे-फडणवीस सरकारकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या नादुरूस्त महामार्गामुळे शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. विद्यमान सरकारने याकामी जातीने लक्ष न दिल्यास भविष्यात ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात येईल.

 - अनिकेत तटकरे, आमदार