रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर येथील बँकेच्या समोर तरुणीच्या नावे कर्ज काढल्याच्या गैरसमजातून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास आरोग्य मंदिर येथील एचडीएफसी बॅकेच्या समोर घडली.

श्रीमती घुडे, गणेश शिंदे व त्यांचा मित्र आणि एक पोलिस कॉन्स्टेबल (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नरेश विठोबा जाधव (४४, रा. बौद्धवाडी- सोमेश्वर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी नरेश जाधव हे शिवानी मेणे हिला घेऊन आरोग्य मंदिर येथील एचडीएफसी बँकेत गेले होते. तेव्हा जाधव हे शिवानीची आर्थिक फसवणूक करणार असल्याच्या संशयावरून संशयित महिला आणि तिचे अन्य साथिदारही तिथे आले. काही वेळाने नरेश जाधव आणि शिवानी मेणे बँकेतून बाहेर आले असता संशयितांनी जाधव यांनी शिवानीच्या नावे कर्ज काढल्याचा गैरसमज करुन बँकेतून काढलेली रक्कम नरेश जाधव यांच्याकडे मागण्यास सुरवात केली. जाधव यांनी मी बँकेतून रक्कम अथवा कर्ज काढलेले नाही असे सांगूनही संशयितांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी संशयितांसह आलेल्या पोलिस कॉन्स्टेबलनेही मारहाण केली. याप्रकरणी जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत.