पुणे: रस्ता अपघातात जखमी झालेल्या अवघ्या दहा वर्षाच्या मुलीला पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करुनही फायदा झाला नाही. तिला डाॅक्टरांनी ब्रेन डेड घाेषित केले. घरच्यांनी अवयवदानाला संमती दिल्याने तिचे हृदय, यकृत आणि किडनी हे तीन अवयव तीन वेगवेगळ्या रुग्णांवर प्रत्याराेपित केले आहे. मृत्यूपश्चात अवयवदान हाेणारी ती सर्वांत कमी वयाची मुलगी ठरली आहे.
ही मुलगी चिखलीतील कुडाळवाडी येथे राहणारी हाेती. ती, तिच्या कुटुंबातील सर्वांत मोठी हाेती व ती अभ्यासात अत्यंत हुशार, स्मार्ट हाेती. ती कुटुंब, मित्र व शाळांतील शिक्षकांचीही लाडकी हाेती. तिचे आईवडील हे कचरा वेचक आहेत. त्याच्यावरच त्यांच्या घराचा गाडा चालताे. तिला चार वर्षाचा लहान भाऊ आहे. तिचा काही दिवसांपूर्वी रस्ता क्राॅस करताना अपघात झाला हाेता. उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील डाॅ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते. मात्र, डाॅक्टरांनी ब्रेन डेड घाेषित केले.
''घरच्यांनी तिच्या अवयवदानासाठी परवानगी दिली असता तिचे हृदय मुंबईतील फाेर्टिस हाॅस्पिटलमध्ये १ वर्षाच्या मुलीवर प्रत्याराेपित केले, तर यकृत ज्युपिटर हाॅस्पिटलमधील ७ वर्षाच्या मुलीवर प्रत्याराेपित आणि किडनी म्हणजेच मूत्रपिंड हे कमांड हाॅस्पिटलमधील ३७ वर्षांच्या महिलेवर प्रत्याराेपित केले. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
आरती गाेखले, समन्वयक, पुणे विभागीय अवयव प्रत्याराेपण समन्वय समिती.''