जसपूर: कुत्रा माणसाला चावल्यास बातमी होणार नाही! कारण ती नेहमीची घटना आहे. परंतु माणूस कुत्र्याला चावल्यास ही निश्चितच बातमी होते. येथे हे सांगण्याचे कारण म्हणजे काहीशी अशाच प्रकारची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.
कारण खेळत असताना एका मुलाला साप चावला त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु सापाने त्याला विळखा घातल्याने तो मुलगा सापाला चावला. त्यानंतर सर्वजण घाबरले मुलाचा मृत्यू होतो की काय? असे सर्वांना वाटले परंतु मुलगा जिवंत असून साप मात्र मेला आहे. विशेष म्हणजे हा साप विषारी असून कोब्रा जातीचा नाग होता असे सांगण्यात येते. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर असलेल्या जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील गावामध्ये ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती देताना गावकऱ्यांनी सांगितले की, दिपक नावाचा हा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याला विषारी कोब्रा सापाने चावा घेतला. सापाने मुलाच्या हाताला विखळा मारून हाताचा चावा घेतला. त्याने हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे तो मुलगा दोन वेळा सापाला चावला. या घटनेनंतर दिपकला लगेचच उपचारार्थ जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तसेच त्याला सापाचे विष उतरवणारे औषध देण्यात आले आणि दिवसभर देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र अशापद्धतीने व्यक्तीने कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र अशापद्धतीने व्यक्तीने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू होणं ही दुर्मिळ घटना आहे.
विशेषतः जसपूर हा दुर्गम आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला नागलोक असेही म्हटले जाते, कारण या ठिकाणी २०० हून अधिक सापांच्या प्रजाती आढळून येतात. तसेच दरवर्षी पावसाळ्यात आणि अन्य ऋतूतही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या घटना घडतात विशेष म्हणजे तातडीने उपचार न झाल्यास अनेक नागरिक, मुले आणि महिला यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.