कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.

अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि. 4) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती गडहिग्लज पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात बाप लेकाचे मृतदेह पाहून हळहळ व्यक्त केली जात होती.

शेतात दोघांचा खून करण्यात आला. यामध्ये केंचाप्पा मारुती हारके (वय 37), रा. जोडकुरळी, ता. रायबाग, जि. बेळगाव याच्यासह त्याचा मुलगा शंकर केंचाप्पा हारके (वय 4) या पिता-पुत्राचा निर्घृण खून करण्यात आला. अचानक घटना घडल्याने मारेकरी नेमके कोण यावर शंका घेतली जात आहे. परिसरातली काही मेंढपाळांनी पळ काढल्याने पोलिसांचे शोधकार्य त्या दिशेने सुरु आहे. काल रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी थांबून तपास वेगाने करण्यात प्रयत्न सुरू केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हारके व संकरहट्टी परिवारातील मेंढपाळ हे दरवर्षी गावातून गडहिंग्लज परिसरात बकरी बसविण्यासाठी येतात. यंदाही चार दिवसांपूर्वी केंचाप्पा हारके हा आपल्या पत्नी, लहान मुलगी व चार वर्षीय मुलासह पाटील यांच्या शेतात आला होता. त्यांच्याच वरच्या बाजूला हारके यांचे मामा संकरहट्टी यांनी कुटुंबासह तळ केला होता.

शेताच्या बांधावर मृतदेह टाकून मारेकरी पसार

केंचाप्पा पत्नी श्रीदेवी व मुलांसह तिथेच दुसऱ्या तळाच्या ठिकाणी होता. सकाळी दहाच्या सुमारास केंचाप्पाची पत्नी श्रीदेवी ही लहान मुलीसह धुणे धुण्यासाठी गेली होती. त्याचवेळी अज्ञात मारेकर्‍यांनी केंचाप्पाच्या डोक्यावर कुर्‍हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार केले. शरीर यष्टी धिप्पाड असल्याने केंचाप्पाने विरोध केला परंतु मारेकरी जास्त असल्याने त्यांच्यापुढे त्याचे काही चालू शकले नाही. त्याचा खून केल्यानंतर शेतात बांधातील गवतात त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता.

त्याचवेळी केंचाप्पाच्या नातेवाईकाला फोनवरून मारामारी झाल्याची कल्पना संकरहट्टी परिवारातील कोणी तरी दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा केंचाप्पाचा खून झाल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ धाव घेत मुलाकडे पाहिले तेव्हा त्याच्याही शरीरावर ठिकठिकाणी वार करण्यात आले होते. त्याला जखमी अवस्थेत सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचाही मृत्यू झाला.

पोलिसांची कसून चौकशी

गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके हे तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी काहींची चौकशी केली. यामध्ये केंचाप्पाच्या पत्नीने झटापट होताना आपण नसल्याचे सांगितले. तर संकरहट्टी परिवारातील एकमेव वयोवृद्धा त्या ठिकाणी होती. मात्र, तिनेही आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. वीराप्पा संकरहट्टी, बिराप्पा संकरहट्टी, कर्‍याप्पा संकरहट्टी या तिघांनी तळावरून पळ काढल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते.