मंडणगड : रायगड जिल्ह्यातील वाळू उपसाच्या परवानगीचा आधार घेऊन म्हाप्रळ रेती बंदर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी बेकायदेशीरपणे वाळू उपशांचा उद्योग सुरु केला आहे. महसुल विभागाची फसवणूक करुन उपसा करण्यात आलेली वाळू मंडणगड तालुक्यात बांधकामासाठी चढया भावाने विकली जात असल्याने महसुल विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

सावित्री नदी पात्रात म्हाप्रळ येथील अधिकृत वाळू उपसा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. दुसरीकडे नवीन बांधकाम हंगामास सुरुवात झाल्याने बाजारात वाळूची मागणी वाढली आहे व परवाना मिळुन रीतसर वाळू व्यवसाय सुरु होण्याच्या सर्व शक्यता मावळलेल्या असल्याने वाळू माफियांनी चोरटी वाळू व्यवसायास प्राधान्य दिलेले आहे. यंदाही शासनाचा महसूल बुडणार आहे. स्वामित्व धनाचा वाढलेला आकार शासनाने नुकताच कमी केलेला असल्याने महसूलात वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र पांरपारिक हातपाटीचे चाळू उपशाची कोणतीही लिलाव प्रक्रिया अद्याप घोषीत झालेली नाही. दुसरीकडे रायगड जिल्ह्यात वाळू व्यवसायिकांनी शासनाच्या बदललेल्या धोरणाचा लाभ घेतलेला आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पाण्यातील सीमांचा सध्याचा दोन्ही बाजूनी गैरवापर सुरु आहे. आंबेत, फळसप, संदेरी, आमशेत, सापे इत्यादी ठिकाणी वाळू उपशाचे परवाने मिळाले आहेत, दुसरीकडे मेरीटाईम बोर्डाचे अधिकाऱ्यांनी केवळ टेबलवर बसून केलेल्या अहवालामुळे सावित्री नदी पात्रात रत्नागिरी जिल्ह्यासाठी कुठलाही रेती गट सध्या शिल्लक राहिला नसल्याने सिमांचा प्रश्नच संपलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उपसा करुनही महसूल मात्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती खनिकर्म विभागाच्या महसूलातून गोळा झालेल्या निधीपासून वंचित राहीलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे भौगीलक दृष्ट्या मंडणगड तालुक्यास जवळची आहेत. नदी पार केली की, मंडणगड तालुका सुरु होतो त्यामुळे रायगडातील रॉयल्टीची वाळू आहे, असे सांगून सध्या वाटेल ते प्रकार सुरु आहेत.

म्हाप्रळ येथील पोलीस चेक नाका येथे रॉयल्टी तपासणीची पोलीस तसदी घेत नसल्याने रायगडच्या नावाखाली म्हाप्रळातील स्थानिक वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. येथील वाळू व्यवसायिक म्हाप्रळसह रायगड जिल्ह्याचे हद्दीत जावूनही वाळू उपसा करुन प्रशासनाच्या डोळ्यात म्हाप्रळमधील वाळू उपास बंद असल्याची धूळ पेक करीत आहेत. रात्रीच्या रात्रीत ऑर्डरनुसार वाळू उपसा करुन गाड्या पाठविल्या जातात, सकाळी कुठल्याही प्लॉटवर वाळू चा एक कणही दिसून येत नाही कायद्यातील पळवाटांचा पुरेपूर फायदा उचलून महाग व चढ्या भावात वाळू विक्री सुरु असून महसूल विभागाने यावर अंकुश न घातल्यास सर्वसामान्य तालुकावासीयांचे लुटीचे सत्र असेच सुरु राहणार आहे.