रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील न्यू शांती हॉटेल शेजारी एलपीजी गॅसची चोरी करणार्‍या दोघांना रत्नागिरी ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महेश यादव, महम्मद युसुफ हलीम (52, उत्तरप्रदेश) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची तक्रार कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. चे मॅनेजर शुभांग बिजेंद्रपाल सिंग यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. कंपनीचा गॅस जयगड पोर्ट येथे येवून गॅस पाईपद्वारे टँकरमध्ये लोड करण्यात येतो. यातील गॅस टँकर लोड करुन जयगड पोर्ट ते कर्नाटक असा पाठवण्यात येत होता. मात्र 17 ऑक्टोबर 2022 रोजी करबुडे येथील न्यू शांती हॉटेल शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये टँकरमधील गॅस अज्ञातांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली होती. याबाबतची फिर्याद पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्याने महेश यादव, महम्मद हलीम आणि अन्य तीन यांनी चोरल्याचे उघड झाले. पोलिसांनी महेश आणि महम्मद या दोघांना ताब्यात घेतले दरम्यान तीन संशयित फरार झाले. दोघांना मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.