रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सरपंच सौ.जान्हवी घाणेकर, माजी सरपंच भिकाजी गावडे, ग्रामसेवक संजय लोखंडे, खेडशी ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

दुपारी पूर्वा सावंत यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि माझा अनुभव या विषयावरील संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्व आणि त्यातील सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध शिबिराची माहिती दिली. ज्योती घडशी यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक दिशा कशी निवडावी आणि राष्ट्रीय सेवा योजनाविषयी महत्त्वाची माहिती दिली. अभिप्रायाच्या माध्यमातून आपली मते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सप्रे याने केले तर साक्षी चव्हाण हिने आभार मानले.